खैर वृक्ष
#खैर
#acacia_catechu
काता बद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष खैर- बाभूळ,खदिर वगैरे नावाने ओळखली जाणारी वनस्पती असून, फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अकेशिया कॅटेच्यू आहे.
खैर हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. ९ ते १२ मीटर उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या व जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान, पण टोकाला वाकडे असतात.
पाने संयुक्त व पिसासारखी असून, दलाच्या दहा-बारा जोड्या असतात.
फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिशावर ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येतात.
शेंगा पातळ पिंगट सरळ पाच ते आठ सेंटीमीटर लांब व टोकास चोची सारख्या असतात. त्यात तीन ते दहा बिया असतात
खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्यास वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, होड्या घराचे खांब, तलवारीच्या मुठी,तेलाच्या घाण्यांच्या लाटा, जात्याचा खुंटा, लोहार, सुतार यांच्याकडील हत्यारांचे दांडे, उसाचा रस काढायचा चरक इत्यादीसाठी उपयुक्त असते. खैराच्या खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास 'कात' म्हणतात.
कोवळी पाने आणि फांद्या शेळ्या- मेंढ्या आवडीने खातात.
खैर वृक्षाचे लाल खैर आणि सोन खैर असे दोन प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अकेशिया चुंद्रा आहे. सोन खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अकेशिया सुमा आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त करून लाल खैर हाच आढळून येतो,आणि हाच खैर काताचे झाड म्हणून प्रसिद्ध आहे.
खैराचा डिंक मधुर, बळकट आणि धातुवर्धक असतो. हिरड्या आणि दातासाठी वापरण्यात येणारे इरिमेद तेल हे खैरापासून करतात
आयुर्वेदिक औषधांमध्ये तोंडाचे आजार, डायरिया, तसेच पचन सुधारण्यासाठी, दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात पाचक,रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी आणि खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर होतो. कात अत्यंत औषधी आहे. मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमवण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात, तसेच काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो.
#सुचेता_दळवी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा