शमी

शमी

#शमी

#खेजरी

#prosopis_cineraria


शमी किंवा खेजरी हा लेग्युमिनेशी कुळातील वृक्ष असून बहुवर्षीय वृक्ष आहे. याचे वैज्ञानिक नाव 'प्रोसोपीस सिनेरेरिया' हे आहे. तर इंग्रजीमध्ये यास स्पंज ट्री असे म्हटले जाते. धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. ज्यांना शनि देवाला प्रसन्न करून घ्यायचा आहे त्यांनी शमी वृक्ष लावावा असे म्हणतात. या प्रोसोपीस वंशात आपल्याला 44 प्रजाती दिसून येतात. या प्रजाती भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, त्याचबरोबर अरब देशातील वाळवंटी भागात दिसून येतात. संस्कृत मध्ये यास 'शमी' असे म्हणतात तर राजस्थानमध्ये खेजडी दिल्लीमध्ये जोंटी, पंजाब हरियाणा मध्ये जोंड,  गुजरात मध्ये समी किंवा सुमरी, कर्नाटक मध्ये बन्नी, तामिळनाडूमध्ये वन्नी तर अरब देशात गाफ असे म्हणतात अतिशय कमी पाणी, तेज धूप, गरम हवा, अतिशय कमी तापमान सहन करणारा हा वृक्ष वाळवंटी प्रदेशात केवळ तग धरून राहतो एवढेच नव्हे तर सदा हिरवागार असतो. त्यामुळेच याला थारचा कल्पवृक्ष किंवा राजस्थानचा कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने 31 ऑक्टोबर 1983 मध्ये त्याला राजस्थान राज्याचा  राज्य वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या वृक्षाची उंची साधारण ५ ते ८ मीटर असते. हा वृक्ष नेहमी सदाहरित असतो, त्यामुळे वाळवंटामध्ये सावली देतो याच्या ज्या झाडांची उत्पत्ती नैसर्गिकरित्या होते त्यांची मुळे अत्यंत खोलवर जातात.फांद्यांवर उलट्या दिशेने वक्र काटे असतात. झाड लहान असताना पानांच्या मधल्या देठावर उलट्या दिशेला वक्र काटे असतात. झाड लहान असताना काटे खूप असतात, परंतु जसजसे झाड मोठे होत जाते तसतसे काटे कमी होत जातात. 

खेजरीची फुले-#मीझर


या खेजारी वृक्षावर जी फुले येतात त्यांना 'मीझर' असे म्हणतात. खेजरीचे फुल फिकट पिवळ्या किंवा दुधी या रंगाचे लांबट गोल असते. त्याची लांबी बऱ्याचदा ५ ते २३ सेंटीमीटर पर्यंत असते. मार्च ते मे या कालावधीमध्ये या वृक्षावर फुलांचा बहर असतो. एप्रिलमध्ये जास्तीत जास्त फुले झाडावर असतात. फुले ही उभयलिंगी असतात. त्यामुळे परागीकरण होण्यामध्ये कीटक, पतंग, मधमाशी यांची भूमिका खूप महत्त्वाची असते.

#सांगरी


एप्रिल ते मे मध्ये झाडावर शेंगा धरू लागतात ज्यांना 'सांगरी' असे म्हणतात. या कच्च्या शेंगा जशा तोडत जाईल तशा नवीन जास्त शेंगा येतात. कच्च्या शेंगांचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांचाच असतो. या कच्च्या शेंगांची भाजी बनवतात परंतु लवकरच त्या पिकू लागतात त्यामुळे कच्च्या शेंगा तोडून त्या उकडून वाळवून त्या साठवल्या जातात. त्यांची विक्री सुद्धा केली जाते. या सुकवलेल्या शेंगांची पण भाजी केली जाते. या सुकवलेल्या शेंगा वर्षभर केव्हाही वापरता येतात. या सुकवलेल्या #सांगरी ला बाजारात 1000 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. त्याचप्रमाणे हिरवी सांगरी १०० ते १५० रुपये किलो दराने विकली जाते. राजस्थानामध्ये तिज, त्योहार, लग्न अशा प्रसंगी 'सांगरी'ची भाजी आवर्जून केली जाते. विशेष करून होली, शीतला सप्तमी यावेळेस सांगरीची भाजी केलीच जाते. आजकाल शहरांमध्ये राजस्थानी लग्नात सुद्धा ही भाजी केली जाते. आता तर सुकवलेली सांगरी' अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतात. मोठ्या शहरातून मोठमोठ्या हॉटेलमधून 'सांगरी' भाजी  उपलब्ध असते.या सांगरी ची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

#खो खा 


याचप्रमाणे या शेंगा पिकल्यानंतर त्यांना 'खो खा' म्हणतात. या पूर्ण विकसित शेंगा लंब गोलाकार असून हलक्या पिवळ्या रंगाच्या किंवा खाकी रंगाच्या असतात. त्या साधारण आठ ते 19 सेंटिमीटर पर्यंत लांब तर सरासरी 0.5 cm पर्यंत रुंद असतात. पिकलेल्या शेंगेमध्ये वीस ते पंचवीस बिया असतात. या अतिशय चविष्ट असून खेड्यापाड्यातील लहान थोर या अतिशय आवडीने खात असतात. याला 'मारवाडी मेवा' असेही म्हणतात. जूनच्या पंधरवड्यात या 'खोखा' जमिनीवर पडतात अशावेळी त्यातील बिया लागवडीसाठी उपलब्ध होतात. 

#लूंग


खेजरी किंवा शमी वृक्षाच्या सुक्या  पानांना राजस्थानमध्ये लूंग असे म्हणतात राजस्थानच्या वाळवंटामध्ये खेजडी वृक्षाचा पाला हा पशूंसाठी एक पौष्टिक आहार मानला जातो. गाय, भेड, बकरी, उंट हा पाला अतिशय आवडीने खातात. याच कारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये या झाडांची छाटणी केली जाते त्यास 'छंगाई' असे म्हणतात. छंगाईनंतर या पानांना सुकवून पुढे वापरण्यासाठी साठवून ठेवले जाते. त्याचप्रमाणे ताजी पाने सुद्धा जनावरांना चारा म्हणून वापरतात. अशी छंगाई केलेल्या वृक्षापासून सांगरी उत्पादन मिळत नाही.  बीजवृक्षापासून आलेल्या चांगल्या सांगरी येणाऱ्या झाडांना सोडून शेतकरी बाकीच्या झाडांचा उपयोग लूंग किंवा हिरवा चारा मिळवण्यासाठी करतात.

#पौराणिक महत्त्व

 आपल्याकडे विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी श्रीरामांनी शमी वृक्षाची पूजा केली होती आणि विजयासाठी आशीर्वाद घेतले होते. महाभारतातही शमी वृक्षाचा उल्लेख आढळतो. पांडवांनी बारा वर्ष वनवास पूर्ण केल्यानंतर विराट राजाच्या पदरी एक वर्ष अज्ञातवासात जाताना आपली शस्त्रे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती. त्याचबरोबर कुरुक्षेत्रावर युद्धावर जाताना सुद्धा पांडवांनी शमी वृक्षाची पूजा केली होती. 

शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी| 

अर्जुनस्य धनुर्धरी रामस्य प्रियदर्शिनी ||

करिष्यमाणयात्रया यथाकालम् सुखम् मया |

तत्रनिर्विघ्नकत्रीत्व भव श्रीरामपूजीता||

म्हणजेच शमी हा पापांचा नाश करणारा आणि शत्रूचा विनाश करणारा अर्जुनाचे धनुष्य वाहणारा श्रीरामांना प्रिय आहे. श्रीरामांनी ज्या प्रकारे तुझी उपासना केली त्याचप्रमाणे आम्ही करतो. आमच्या विजयाच्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर आणि आमचे जीवन सुखमय बनव.

कवी कालिदासांनी शमीच्या झाडाखाली तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केले असेही मानले जाते.यज्ञ विधीसाठी लाकूड पवित्र मानले जाते. त्यास समिधा असे म्हणतात. शमी हे गणेशाचे देखील आवडते झाड मानले जाते. त्यामुळे गणेशाच्या पूजेमध्ये शमीच्या पानांचा समावेश असतो.

हिंदू पौराणिक कथेनुसार शमी किंवा बन्नी झाडाचे कौतुक एक शुभ वनस्पती म्हणून केले जाते त्याची पाने आणि फुले शंकराच्या पूजेसाठी वापरली जातात.

#घरगुती उपाय 

हा विभाग डॉक्टर एम एस  कृष्णमूर्ती एमडी (आय यु)  पीएचडी यांनी त्यांच्या लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे खालील प्रमाणे आहे

तोंडाचे व्रण :-

बन्नीच्या सालीच्या काढ्याने  तीन ते चार दिवस चुळा भरल्यास तोंडातील व्रण शांत होतात. एक चमचा सालीची पावडर घेऊन दोन कप पाण्यात एक कप होईपर्यंत उकळावे व त्याने चुळा भराव्यात 

सांधेदुखी, आमवात:-

सालाची पावडर घेऊन चार भाग गरम पाण्यात ठेवावे. कोमट असताना गाळून घ्यावे 20 ते 30 मिली जेवणापूर्वी दिवसातून एकदा किंवा दोनदा त्रासानुसार घेतल्यास जुनाट आमवात व सांधेदुखी कमी होते.

खाज सुटणे किंवा त्वचारोग:-

ताजी पाने वाटून त्याचा लगदा खाज येणाऱ्या जखमेवर लावता येतो तसेच डोक्यातील कोंडा, खाज यावरही गुणकारी आहे 

अतिसार 

जुलाबासाठी ताज्या फळांचे सूप घेण्याचा सल्ला दिला जातो. ताजी न पिकलेली फळे भाजी म्हणून वापरली जातात आतड्याची सवय नियंत्रित करण्यासाठी हे प्रभावी औषध आहे.

वारंवार गर्भपात 

वारंवार गर्भपात होत असेल तर फुलांची बारीक पेस्ट करून खडीसाखरेबरोबर दररोज काही दिवस दिल्यास गर्भपाताची भीती कमी होते.

चेहऱ्यावरील केस काढणे 

फळे चांगली बारीक ठेचून बारीक पेस्ट केली जाते व ज्या भागात केसांची अतिरिक्त वाढ दिसते तिथे नियमित लावल्यास नैसर्गिकपणे चेहऱ्यावरील केस काढण्याचे काम ही वनस्पती करते 

विंचूदंश 

विंचू दंशावर शमीच्या झाडाच्या सालीची पेस्ट लावली असता त्या जागेची सूज कमी होते आणि आग शांत होते 

धन्वंतरी निघंटू नुसार आजार बरा झाल्यानंतर शमीच्या सालीच्या पाण्याने अंघोळ केली जाते ते एक प्रकारे निर्जंतुकीकरण करण्याचे काम करते 

 #बिश्नोई चळवळ

इ.१७३० मध्ये महाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवले. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते. ते शोधताना जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्‍नोईंचे खेजडली गाव होते. गावाजवळ खेजडीची मुबलक झाडी होती, जवळच चुन्याच्या खाणीही होत्या. राजाचे कामगार कुऱ्हाडी घेऊन खेजडलीला पोचले. बिश्‍नोई लोकांनी विरोध केला. संतप्त दिवाणाने हुकूम केला, "चला, झाडे तोडा.' सारे गावकरी विनवण्या करू लागले, "आमचा धर्म तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका." वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. सैनिकांच्या तलवारीने अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले. आणि बिश्‍नोईंचे जीव गेल्यावर राजाची मग्रुरी उतरली. तो खेजडलीला पोचला, माफी मागितली. यापुढे बिश्‍नोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही, अशी हमी दिली. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने या आंदोलनाला खूप महत्त्व निर्माण झाले. यानंतर सरकारने अमृता देवींच्या नावाने पुरस्कार सुरू केला त्याचप्रमाणे खेजडी वृक्षाला कायमचे संरक्षित केले गेले.

1983 ला राजस्थानने शमी किंवा खेजडी या वृक्षाला राज्य वृक्षाचा दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे आता केंद्रीय बागवानी संस्था बिकानेर यावर अधिक संशोधन करून कमी काटे असलेल्या आणि चांगल्या प्रकारचे सांगरी उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करत आहे. यामध्ये 'थार शोभा', 'थार अमृता'यांचा प्रामुख्याने समावेश होतो कारण  व्यापारी दृष्टीने सुद्धा 'सांगरी' उत्पादनाला अधिक महत्त्व आले आहे. सध्या परदेशात राहणारे राजस्थानी लोक सांगरीचे मोठे ग्राहक आहेत. त्यामुळे निर्यातीला   पण खूप संधी आहे. या दृष्टीने आता खेजडी वृक्षाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड केली जाते.

डॉ सुचेता दळवी 

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी 

पुणे 






टिप्पण्या