#निर्गुडी


 

#निर्गुडी

लॅटिन- VITEX NIGUNDO

English -Five leaved chaste

संस्कृत- निर्गुण्डी

कोकणामधे शेताच्या बांधावर, परसावनाच्या कुपणीवर,अगदी इकडे तिकडे मोकळ्या जागी सहजतेने तुम्हाला ही वनस्पती दिसून येते.

कुणाचा पाय मुरगळला असेल, वयोमानानुसार सांधे दुखत असतील, सांध्यांना सुज आली असेल तर लगेच निगडीचा पाला आणला जातो, पान गरम करून सुजलेल्या जागी ठेऊन वरुन पट्टीने बांधले की झाले काम.

बाळंतीण बाईच्या आंघोळीच्या पाण्यात निगडीचा पाला हमखास टाकला जातो. तसेच बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर जर काही दिवस निगडीची चार-पाच पानांचा काढा घेतला तर गर्भाशयाची अंतर्गत स्वच्छता व्हायला मदत होते.

कंबरदुखी वर निगडीच्या पानांचा लेप आणि काढा यांचा चांगला गुण येतो. मासीक पाळीत खुप पोट दुखणं असेल तर निगडीच्या चहाने आराम पडतो. बाळंतीण बाईला वात वाढू नये म्हणून निगडीचा पाला पाण्यात उकळून त्याचा वाफारा सर्वांगाला दिला जातो. निगडीचे तेलाने हलके मालीश केल्यास दुखणाऱ्या सांध्यांना आराम पडतो.

तोंड आले असेल तर यांच्या काढ्याच्या गुळण्या केल्याने फरक पडतो.

इतकेच काय विंचू उतरवण्यासाठी ही या वनस्पतीच्या पानांचा वापर केला जातो. सुगी नंतर कणंग, हातऱ्या मधून भात भरून ठेवला जातो तेव्हा भात भरल्यावर निगडीच्या सुक्या पानांचा थर दिला जातो आणि मग त्या लिंपून घेतात.

आजकाल मच्छर पळवण्यासाठी तिन्हीसांजेला घरात,गोठ्यात निगडीच्या पानांचा धुर केला जातो.

आणखी एक गमतीशीर गोष्ट अशी की कोंकणातील मास्तर नाठाळ पोरांना वठणीवर आणायला शिमटी वापरतात ती सुध्दा निगडीचीच. घरात पोराने एखादा हट्ट धरून ठेवला तर आईचं शेवटचं हत्यार म्हणजे " थांब तुला बघतेच,आण ,आण ती निंगडीची शिमटी" की पोरानी तिथून धूम ठोकलीच पाहिजे. तर अशी ही बहुगुणी वनस्पतीचा वापर गावखेड्यातील मंडळी वर्षानुवर्षे करतच आहेत परंतू त्याचे हे ज्ञान नव्यापिढीपर्यत पोहचले पाहिजे.त्यांना ह्या वनस्पतींची ओळख झाली पाहिजे जेणे करून यावनस्पतीचे संरक्षण होईल, संवर्धन होईल.

माहीती संकलन

प्रा.डाॅ सुचेता दळवी

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शमी

कांचन वृक्ष

#अर्जुन वृक्ष