कांचन वृक्ष

#कांचन वृृक्ष
#Bauhinia variegata

                    'कांचन' आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये त्याचा उल्लेख अतिशय दिमाखात आणि महाराष्ट्राची ओळख म्हणून केलेला आहे. तोच हा कांचन वृक्ष!

आठवतात का बघा तुम्हाला या ओळी!

                                            अंजन,कांचन करवंदीच्या काटेरी देशा |

                                            बकुळ फुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा ||    

                   यावरून तुमच्या हेही लक्षात येईल की महाराष्ट्राची ओळख बनलेले हे झाड तुम्हाला कोठेही पाहायला मिळते. सदाहरित असल्याने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा ही झाडे लावलेली दिसतात.

                  कांचन हा मध्यम आकाराचा वृक्ष असून कुठल्याही प्रकारच्या जमिनीत सहज वाढतो. एकदा मोठा झाला की याला पाण्याची गरज नाही, पावसाचे पाणी पुरते. याची मुळे जमिनीत खोल जाऊन पाणी शोषतात. याची पाने आपट्याच्या पानांच्या आकाराची असतात. पण आकाराने मोठी आणि हिरवीगार असतात. आपट्यापेक्षा ही कमी खरखरीत असतात. वर्षभर हे झाड सदाहरित राहते. त्यामुळेच जास्त कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला ही झाडे लावलेली दिसतात. नोव्हेंबर च्या आसपास याच्या फांदीच्या टोकावर गुलाबी, जांभळट छटा असलेली सुंदर फुले येतात. ती फारच सुंदर दिसतात. फुलांपाठोपाठ लगेचच दहा-पंधरा बिया असलेल्या साधारण आपल्या हाताच्या उंचीच्या, चपट्या, बोटभर रुंदीच्या शेंगा पण येतात. शेंगा वाळून तपकिरी रंगाच्या झाल्या की त्या झाडावरच तडकतात आणि बिया झाडाखाली पडतात. उन्हाळ्याचा काळ असल्याने याच्या बिया या झाडा खालून सहज गोळा करता येतात.

                 वैशाखात कडक उन्हात बिया वाळवून, गादीवाफ्यावर किंवा पिशवीत बिजारोपण केले असता, या बिया अगदी सहजतेने उगवून येतात.

                असा हा आपल्या महाराष्ट्राची ओळख असलेला कांचन लोकांच्या वेडेपणामुळे मात्र दुर्मिळ होईल की काय अशी भीती वाटते.याची पाने आपट्याच्या पानासारखी दिसतात म्हणून दसऱ्याच्या वेळेस याची बेसुमार तोड आणि विक्री होताना दिसून येते याचा परिणाम पुढे येणाऱ्या त्याच्या बहरावर नक्कीच होतो.

                नावातच कांचन असलेल्या या वृक्षाला आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये मात्र सोन्याचे मोल आहे,'कचनार गुग्गुळ सारखे औषध याच झाडाच्या सालीपासून बनवलेले आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाची 'साल' प्रामुख्याने औषधी उपयोगासाठी वापरली जाते. पतंजलीचे, आचार्य बालकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार याच्या सालीचा काढा हा अनेक आजारावर रामबाण उपाय आहे. तर 'कंचनार गुग्गुळ' हे प्रामुख्याने शरीरावर येणाऱ्या चरबीच्या गाठींसाठी उपयुक्त आहे. याच्या पानांचा रस कावीळ साठी उपयोगी आहे.

                कांचन वृक्षाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. फुलांचा गुलकंद बनवला जातो. कळ्यांची भाजी किंवा लोणचे करतात, असेही संदर्भ मिळाले आहेत असा हा सोन्यासारखा वृक्ष आपण तितक्याच जबाबदारीने जपला पाहिजे. एकवेळ लागवड केली नाहीत तरी चालेल पण रितीरिवाजांच्या नावाखाली ओरबाडू तरी नका. नाही तर आज महाराष्ट्राची ओळख असलेला हा कांचन दूर्मिळ व्हायला वेळ नाही लागणार.  

#सुचेता_दळवी 

#Sucheta_Dalvi

टिप्पण्या