#लाजाळू
#लाजाळू
#MimosaPudica
#छूईमुई
#touchMeNot
मित्रांनो तुम्हाला आणि मला सर्वानाच लाजाळू ही वनस्पती माहित आहे. कधी कुणी प्रत्यक्ष पहिली नसेल तरी तिचा मुख्य गुणधर्म बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतो तो म्हणजे आपण हात लावताच लाजाळूची पाने मिटतात. लहान पणी तर या गोष्टीची फारच मजा वाटायची. माझ्या एका मैत्रिणीकडे लाजाळूचे झाड होते. शाळेमध्ये जेव्हा आम्हाला लाजाळू बद्दल शिकवले तेव्हा तिने आम्हाला सांगितले की हे झाड आमच्या कडे आहे मग काय ते झाड पाहण्यासाठी आसपास राहणाऱ्या सगळ्या मुलींचा ताफा त्या मैत्रिणीच्या घरी पोचला, कशाला तर लाजाळूला बघायला.बस इतकेच जनसामान्यांना या वनस्पती बद्दल माहित असते. आज आपण तिच्या बद्दल अधिक जाणून घेऊया
लाजाळू ही हिंदी मध्ये ही छूईमुई, लाजवंती, शर्मिली अशा विविध नावाने ओळखली जाते तर इंग्रजी मधे तिला touch me not असे म्हणतात तिचे scientific name 'Mimosa Pudica'
लाजाळू ही झुडूप वर्गीय वनस्पती आहे तिचे झाड हे जमिनी लगतच पसरते. उदबत्तीच्या काडी सारखे बारीक खोड असते. पावसाळ्यात जून जुलै ऑगस्ट मध्ये गुलाबी रंगाची अतिशय सुंदर फुले या लाजाळू वर येतात तेव्हा तिचे रूप इतके मनोहर दिसते कि हातात कॅमेरा असेल तर फोटो काढायचा मोह आवरत नाही, सप्टेंबर मध्ये फुलांच्या जागी करंगळीच्या उंचीच्या पातळ शेंगा दिसू लागतात जसे जसे ऊन तापू लागते तसे शेंगा वाळून तिथेच फुटून पडतात आणि तिथे परत नवी रोपटी येतात. एकदा एखाद्या जमिनीत लागले तर सहजा सहजी नष्ट होत नाही. लाजाळू एखाद्या तना प्रमाणे पसरतच जाते त्यामुळे शेतकरी तिचा रागराग करतात. परंतु या वनस्पतीचे औषधी गुणधर्म जर माहित झाले तर कधीच कुणी तिचा राग राग करणार नाही तिला उपटून आपल्या शेतातून टाकणार नाही उलट म्हणेल मी हिचीच शेती करतो.
मित्रांनो आहे कि नाही गंमत तुम्ही कितीही मुळापासून उपटले तरी नष्ट होऊ नये अशी निसर्गाने कशी व्यवस्था करून ठेवली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा