#अर्जुन वृक्ष
#अर्जुन वृक्ष 
लॅटिन नाव-Terminalia Arjuna
आज आपण अर्जुन ह्या दैवी गुण असलेल्या वृक्षांची ओळख करून घेणार आहोत.अर्जुन ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ पांढरा स्वच्छ.त्याच्या पांढऱ्या खोडामुळे त्याला हे नाव मिळाले असावे असे वाटते.अर्जुन हा एक विशाल वृक्ष आहे साधारणपणे ६०-८० फुटांपर्यंत पण वाढतो त्याची कठीण कवचाची फळे नदीत वाहत जाऊन रूजत असावीत त्यामुळे नदीच्या कडेने हे वृक्ष दिसून येतात.किंचीत राखाडी झाक असलेले गुळगुळीत पांढुरके खोड हे याचे खास वैशिष्ट्ये आहे.
ऐन आणि अर्जुन
कोकणामध्ये ऐन आणि अर्जुन असे दोन्ही वृक्ष दिसून येतात बऱ्याचदा ऐन आणि अर्जुन यामध्ये गल्लत होताना दिसून येते. दोन्हीही वृक्ष सारखेच दिसतात परंतु ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले तपकिरी असते तर अर्जुनाचे खोड पांढुरके आणि गुळगुळीत असते.
अर्जुनाची फळे
अर्जुनाची फळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात ताक करायच्या रवी चे कणीस असते तसे पाच पंख असलेले फळ असते. पूर्ण तयार झाल्यावर याचा रंग तपकिरी दिसतो आंब्याच्या बाट्याप्रमाणे यावर कठीण कवच असते. नदीच्या पाण्यात वाहत जाऊन नदीकाठी याची झाडे उगवलेली दिसून येतात त्यामुळे 'नदी सर्ज' असेही नाव पडले आहे
पाने
पानांच्या मागे देठाजवळ मधल्या शिरेच्या दोन्ही बाजुस दिसणाऱ्या लहान ग्रंथी हे याचे खास वैशिष्ठे आहे.
औषधी उपयोग
प्रत्येक बहराला या दैवी वृक्षाची साल आपोआप गळून पडते, जिचा उपयोग आयुर्वेदामध्ये अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो त्यामुळे या वृक्षाला 'देवसाल' असेही नाव पड़ले आहे .
आयुवेदानुसार अर्जुनाची साल अनेक आजारावर गुणकारी आहे. या साली पासुन अर्जुनासव व अर्जुनारिष्ठ ही औषधे बनवतात. खासकरून हृदयाच्या आजारावर ही गुणकारी असल्याचा उल्लेख आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आहे.असे असले तरी कानाच्या आजारात याच्या कोवळ्या पानांचा रस वापरतात,याच्या फुलांपासुन नेत्रांजन बनवतात, मुखांच्या आजारात याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या करतात, पोटाच्या अनेक आजारात हा गुणकारी आहे, मुळव्याध तसेच महीलांच्या आजारात ह्याच्या सालीचा वापर करतात . अशाप्रकारे याच्या सेवनाने अनेक आजाराचे निर्मुलन होते त्यामुळे यास 'धन्वंतरी' असेही म्हटले जाते .
टसर सिल्क
नैसगिक रित्या 'टसर सिल्क' निर्मान करणारे रेशमि किडे 'एन्थिरिया मायलिटा' यांचे अर्जुनाची पाने हे प्रमुख खाद्य आहे त्यामुळे आदिवासी बांधवांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे हा वृक्ष.
याच्या बद्दल अशीही आख्यायिका आहे की नारदाने शाप दिल्यामुळे कुबेराचे पुत्र अर्जुन रुपात पृथ्वीवर जन्माला आले. कृष्ण अवतारामध्ये गोकुळामध्ये श्रीविष्णुंनी त्यांना शापमुक्त केले. त्यामुळे गौरी गणपती च्या पुजा विधी मध्येही याचे महत्त्वाचे स्थान आहे कोकणामध्ये गौरीच्या ओवस्याच्या सुपात याच्या फळाचा आवर्जुन समावेश केला जाते.
लागवड
याची लागवड करणे सोपे आहे. पूर्ण तयार झालेली फळे आणून उन्हात खडखडीत सुकवावी पुढच्या वर्षी जून-जुलै मध्ये रोपे तयार करावी. त्यापूर्वी ४८ तास पाण्यात बिया भिजत ठेवाव्या. त्याच्या पुढच्या वर्षी ही रोपे लागवडी योग्य होतात.
मित्रांनो अभ्यासाअंती वृक्षांचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे हे लक्षात येते. उगीच नाही तुकाराम महाराजांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'




चला तर मग एकतरी झाड लावूया!
माहीती संकलन
प्रा डॉ सुचेता दळवी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा