बिब्बा

 #बिब्बा





आजीबाईचा बटव्यातील आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे बिब्बा किंवा बिबवा.हिंदी मध्ये याला 'भिलावा' तर संस्कृत मध्ये 'भल्लातक' असे म्हणतात.शास्त्रीय भाषेत 'सेमीकार्पस ऍनाकार्डीयम' असे म्हणतात. यापासून काळा रंग मिळतो तो पक्का बसतो त्यामुळे धोबी कपड्यावर नावे टाकण्यासाठी याचा वापर करत यामुळे इंग्रजीत यास 'Marking Nut' असेही म्हणतात.
खरं तर ही जंगल संपत्ती त्यामुळे बहुतांशी आदिवासी बांधव रानातून गोळा करुन त्याची विक्री करताना दिसून येतात.पूर्वी सुया पोत विकणाऱ्या बायका हमखास बिब्बे घेऊन यायच्या.कोकणात मात्र अजूनही माळावर बिबव्याची झाडे दिसून येतात. कोकणात याला बोंडीचे झाड असे म्हणतात.सर्वसाधारण कोकणी लोकांना परंपरागत रित्या यांचे औषधी गुणधर्म माहीत आहेत.प्रत्येक घरात बिबवे ठेवलेले एक विशिष्ट मडके किंवा डब्बा असतोच. पायात मोडलेला काटा काढला की त्याजागी बिबव्याचा डाग द्यायचा हा ठरलेलाच उपचार, आता पायात पाणी होणार नाही याची अगदी खात्री.पायाला चिखल्या झाल्या,पायाला भेगा पडल्या,सांधे दुखत असतील,पाठ दुखत असेल,पायाला नखुरडे झाले असेल (कोकणात कोन्या म्हणतात)लावणीच्या वेळी भात खाचरात पायाला काही लागून जखम झाली असेल की बिबव्याचा डाग हा जालीम पण खात्रीचा उपाय ठरलेलाच. माझी आई पाठ दुखायला लागली की पाठीवर बिबव्याचा डाग घ्यायची आणि ते काम बऱ्याचदा ती मलाच सांगायची,भीती वाटायची, पण नंतर सवय झाली.हे काम खूप जपून करावे लागते.बिबव्या मध्ये दाभण सारखी टोकदार वस्तू टोचायची आणि उघडा भाग गोडेतेलाच्या दिव्यावर धरायचा की त्यातून जे तेल बाहेर येते ते पटकन लावायचे. याला बिबव्याचा डाग असे म्हणतात. एक थेंब तेल पडले की एक फुली पडली असे म्हणतात. पोटातून औषध देताना फुली वर प्रमाण मोजतात. पण हे करताना जर तेल अंगावर उडले तर फोड येतात त्याला 'बिबवा उतला' असे म्हणतात. असे झाले तर कोथिंबीरीचा रस लावावा.नविन सुपे, दुरड्या यांना बिबव्याचे तेल लावले जाते.वर्षभराचे तिखट, हळद यांच्या बरण्यातही जाळी पडू नये म्हणून बिबवे ठेवले जातात.
बिब्बा फळे

बिब्बा फळे 


बिबव्याच्या झाडाला काजूच्या झाडाप्रमाणेच फळ येतात बोंड वरती आणि बी फळांच्या बाहेर.बी काळीभोर झाली की बोंडपण पिवळी धम्मक होऊन पिकायला लागतात.अशी फळ आणून त्यांचे बिबवे बोंडापासून काढून वेगळे ठेवले जातात. या बोंडांच्या माळा बनवून खुंटीला टांगून ठेवतात. बोंड जशी जशी सुकायला लागतात तशी घरातली लहानथोर मंडळी जाता येता ती आवडीने खातात.
गोडंबी

बिबवे काजूप्रमाणेच भट्टीला लावून त्यातला गर काढला जातो त्याला 'गोडंबी' म्हणतात.ही काढताना पण अंगावर बिबवा उततो. बहुतेक आदिवासी महिलाच हे कठीण काम करतात.
सुक्यामेव्याचे पोष्टीक लाडू करताना त्यात गोडंबीचा समावेश केला जातो.बाळंतपणानंतर आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.पुरूषांना शुक्र धातूची कमतरता झाली असेल तर असे लाडू हे उत्तम टाॅनिक आहे. फक्त गोडंबीचा पण उपचार घेता येतो पण तिखट, तेलकट,मीठ काहीदिवस वर्ज करावे लागते.तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप घ्यावे हे उत्तम. गोडंबी नेहमी गायीच्या दुधात रात्री भिजवून घ्यावी ३-४ दाणे पेक्षा जास्त नको. ४-५ दिवसच घ्यावी. गायीचे तुप आहारात वाढवावे.गोडंबी उष्ण असते, थंडीतच शक्यतो घ्यावी.प्रमाण झेपले नाही तर अंगावर फोड येतात.घाबरून जाऊ नये कोथिंबीरीचा रस लावावा. अशा ह्या बहुउपयोगी वनस्पतीची ओळख करून घेऊन तिचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी खासकरून आंबा, काजूच्या बागा तयार करताना बोंडीची झाड असतील तर ती जपली पाहिजेत.
माहीती संकलन
प्रा डॉ सुचेता दळवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शमी

कांचन वृक्ष

#अर्जुन वृक्ष