जाणून घ्या मिठाचे फायदे

 

मित्रांनो आजीबाईच्या बटव्यातील आणखी एक मुल्यवान रत्न म्हणजे 'मीठ'. तुम्ही म्हणाल मीठ कसे काय मुल्यवान रत्न? उलट आजकाल तर प्रत्येक डॉक्टरकडे गेलो तर तो पहिले सांगतो. ब्लडप्रेशर वाढले, मीठ कमी खा. शुगर वाढली, मीठ कमी खा. अंगावर सुज आली, मीठ कमी खा. मीठ, साखर, साबुदाणा, मैदा हे पांढरे पदार्थ तुमचे शत्रू आहेत आणि तुम्ही म्हणता मीठ हे मुल्यवान रत्न आहे. मित्रांनो मला सांगा धारदार सुरीने एखाद्याचा जीव जातो पण तीच धारदार सुरी घेऊन डॉक्टर रुग्नाचे ऑपरेशन करतो. याचा अर्थ काय? थोडक्यात सुरी वाईट नसते तिचा वापर आपण कसा करतो यावर ती चांगली का वाईट ते ठरते.

मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहीत असतील कारण पूर्वापार आपल्या घराघरातून त्या अगदी सहजतेने केल्या जातात पण आजकाल आधुनिकतेच्या नादात आपल्याला त्याचा थोडा विसर पडला आहे.

कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारात जेव्हा घसा खवखवू लागतो तेव्हा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या असता लगेचच आराम पडतो . इतकेच काय पांढरा चिकट कफ झाला असेल तर कितीही उपचार केले तरी कफ सुटता सुटत नाही अशावेळी एक साधासा उपाय करावा.थोडावेळ निवांत बसून बोटाने जीभेला मीठ चाटवावे.कफ सुटलाच पाहिजे. ताप येऊन तोंडाची चव गेली असेल तर लिंबाच्या फोडीवर मीठ,साखर टाकून तव्यावर गरम करावे आणि ते चाटावे तोंडाची गेलेली चव परत येते.

सांधे सुजले असतील किंवा मुका मार लागून सुज आली असेल तर खडे मीठ गरम करून त्या पुरचुंडीने शेकले असता आराम पडतो

खूप ताप आला असेल तर कपाळावर मीठाच्या पाण्याच्या पट्ट्यां ठेवल्या असतां ताप उतरायला मदत होते .

कॉम्प्युटरवर सतत काम केल्यामुळे किंवा जागरणामुळे डोळे तारवटले असतील तर मीठाच्या पाण्यात स्वच्छ कपडा भिजवून डोळ्यावर पट्टी ठेवल्यास आराम पडतो .

प्रवास करून आल्यामुळे किंवा खूप चालल्यामुळे पायांना सुज आली असेल तर गरम पाण्यात पेलाभर खडेमीठ टाकून पाय बुडवून बसल्यास सुज उतरून एकदम आराम पडतो . अशाचप्रकारे खूप थकवा वाटत असेल तर आंघोळीच्या पाण्यात पेलाभर खडेमीठ टाकल्यास लगेचच शीण नाहीसा होतो आणि आपल्याल ताजेतवाने वाटते .

लहानमुलांचे दात किडतात, हिरड्यांना सुज येते अशावेळी त्यांना मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगावे. दिवसातुन एक वेळा मीठाने दात घासले असता हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. ज्यांच्या हिरड्या सैल झाल्या आहेत त्यांनी हमखास रोज एकदातरी मीठाने दात घासावे.

कधी कधी दात तुटून जातात आणि कुण्या राहतात. मग बऱ्याचदा हिरड्या सुजतात, पस होतो आणि ठणका लागतो अशावेळी हिरडीवर मीठ दाबुन धरावे पस निचरून जातो आणि दुखणे पण थांबते.

मीठाचा जंतुनाशक गुणधर्म सुद्धा सर्वज्ञात आहे. पूर्वी साठवणुकीच्या तांदळामध्ये लिंबाचा पाला आणि खडे मीठ टाकून ठेवले जाई. आई लोणच्याची बरणी भरताना खाली जास्तीचे मीठ टाकत असे. त्याचबरोबर वर्षभराचे तिखट करताना हमखास त्यात मीठ टाकले जाते. पुर्वीच्या काळी फ्रिज नव्हते तेव्हां ओले वाटण केले की आजी त्यात बेताने मीठ मिसळत असे आणि मग फडताळात ठेवायची. दोन दिवस तरी तिचे वाटण चांगले राहत असे.

प्रा डॉ सुचेता दळवी






2


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शमी

कांचन वृक्ष

#अर्जुन वृक्ष