सुंठवडा
सुंठवडा -आमवातावरील रामबाण औषध
मित्रांनो माझी आजी झोपताना नेहमी सुंठवडा खात असे. मी तिला एकदा विचारले आजी तू हे का खाते तेव्हा तिने असे सांगितले कि तिला नेहमी कफ होतो त्यामुळे रात्री झोपताना खोकला येतो म्हणून ती रोज झोपण्यापूर्वी खात असते . मित्रानो त्यानंतर माझ्या जीवनामध्ये या सुंठवड्याची परत भेट झाली ती माझ्या बाळंतपणामध्ये. आपल्याकडे बाळंतीणबाई ला जो विशिष्ट आहार दिला जातो या मध्ये या सुंठवड्याचे विशेष असे महत्व आहे. जेवण झाल्यानंतर बाळाच्या आईला हा सुंठवडा खाण्यासाठी दिला जातो. जस जसे वय वाढत गेले तेव्हा मला या सुंठवड्याचे अनेक गुणधर्म लक्षात आले आणि खरोखरंच आपल्या पूर्वजांचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटला. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आयुर्वेदाची पाळेमुळे इतकी खोलवर गेली आहेत कि जनसामान्यांच्या जीवनाचा एक भाग बनून गेली आहेत त्यालाच आपण परंपरागत ज्ञान असे म्हणतो. आजी कडून आई कडे, आई कडून मुली कडे असे हे ज्ञान पुढे पुढे जात राहते . परंतु काही वेळेला जुनाट या लेबलाखाली याची अवहेलना पण झालेली दिसून येते परंतु आज कोरोना सारख्या महामारीच्या काळात साऱ्या जगाचे लक्ष पुन्हा एकदा भारतीय संस्कृती कडे वेधले गेले आहे. आपणही आपला वारसा जपला पाहिजे नाहीतर परकीय त्याचे पेटन्ट घेतील आणि मग आपले डोळे उघडतात
मित्रांनो बाळाचा जन्म झाला कि सुंठवडा वाटा असेच बरेच जणांना वाटते त्यामुळे बाकीचे लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतू हा माझा ब्लॉग वाचल्या नंतर तुम्ही असे करणार नाही .
मित्रांनो तुम्हाला जर पचनाच्या तक्रारी असतील, पोट फुगत असेल, पोट साफ होत नसेल , कोणत्या ना कोणत्या कारणाने सांधे सुजले असतील, आखडले असतील , गुडघे कुरकुरत असतील, अंगावर सूज आली असेल , सतत एका जागी बसून काम केल्यामुळे सगळे शरीर जकडल्यासारखे वाटत असेल, अंगात पाणी साचत असेल त्यामुळे जडपणा वाटत असेल, रात्री झोपताना खोकला येत असेल तर तुम्ही नक्की रोज जेवणा नंतर एक चमचा सुंठवडा खा.
सुंठवडा कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तुम्ही तो करा, खायला सुरुवात करा आणि तुम्हाला माझ्या ब्लॉग चा फायदा झाला का हे मला नक्की कळवा
![]() |
| सुंठवडा साहित्य |
५० ग्रॅम सुंठ
५० ग्रॅम पांढरे तीळ
२५ ग्रॅम खसखस
१ खोबरे वाटी
१ वाटी खडीसाखर
१/२ वाटी साखर
१०-१२ बदाम हवे असल्यास
१०-१२ काजू हवे असल्यास
२ हिरवी वेलची
प्रथम लोखंडी तवा गॅस वर ठेऊन गॅस बारीक करावा आणि तव्यावर सुंठ ठेवा थोड्यावेळाने सुंठीचा छान वास सुटेल सुंठ हातात घेऊन पहा . ती चांगली फुगलेली दिसेल गॅस बंद करा . थंड झाल्यावर सुंठ आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करून चाळून घ्या . आता खोबरे किसून घ्या . एक एक करून तीळ ,खसखस,खोबरे चांगले खरपूस भाजून घ्या . काजू ,बदाम वेलची हे पण हलके भाजून पूड करून घालावे . हे घालायचे की नाही हे आपल्या आवडी वर आहे. आता सगळे मिक्स करा . गोकुळ अष्टमी साठी सुंठवडा करायचं असेल तर सुंठ अगदी नावाला घालावी पण औषधी उपयोगासाठी करायचा असेल तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. सुरवातीला जेवण झाल्यावर थोडे थोडे म्हणजे अर्धा चमचा खावे. दिवसातून दोनदा फक्त. जेवणात गायीचे तूप घ्यावे. दोनच दिवसात फरक जाणवतो तुमचे गुडघे कुरकुर करायचे कमी होतात. जसे झेपेल तसे १ लहान चमचा पर्यंत घ्यायला काही हरकत नाही.
प्रा डॉ सुचेता दळवी


सुंठ कशी तयार करायची?
उत्तर द्याहटवाड्रायफ्रूट च्या दुकानात मिळते
हटवा